``

गृहपाठ संकल्पना

आपल्या रोजच्या जीवन प्रवासात अनेक विषय येतात आणि जातात :

या सर्व विषयांच्या मांदियाळीत प्रत्येकाची आवड समान असतेच असे नाही आणि तशी असायलाच हवी असेही नाही.

प्रत्येकाच्या रुचीप्रमाणे किंवा गरजेनुसार, प्रत्येकजण

समान आवडीचे विषय असलेले लोक आपोआप एकत्र येतात

काही विषय असे असतात की, आपल्यातील कोणालातरी त्यात अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा असते.

त्याचबरोबर, जर ती माहिती अधिकृत, शास्त्रीय, आणि पूर्वग्रहरहित स्वरूपाची असेल, तर आपण ती जाणून घेण्यास अधिक उत्सुक असतो.

असेच समान आवडीचे विषय असलेले आम्ही ४-५ जण गप्पा मारत होतो. प्रत्येकाकडे जिज्ञासा आणि शिकण्याची प्रामाणिक इच्छा होतीच.

कोविडच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये आम्ही असे ठरवले की –

रोज एक थोडा वेळ आपण आपापल्या घरूनच फोनवर एकत्र येऊन, मूलभूत विषयांवरील अधिकारी लेखकांनी लिहिलेली पुस्तके वाचूया !

गृहपाठ कसा?

वाचनाचे स्वरूप कसे ठेवले?

मार्च २०२० च्या शेवटच्या आठवड्यात आम्ही सुरुवात केली.

आमच्या गृहपाठात मुख्यतः मूलभूत शास्त्र, इतिहास, तत्वज्ञान, विज्ञान, अध्यात्म, समाजव्यवस्था यासारख्या विषयांचा समावेश होता.

आम्ही अधिकारी लेखकांची, मूलभूत विषयांवरील पुस्तके वाचायला सुरुवात केली.

अशा खूप मोठ्या अधिकारी पुरुषांनी अतिशय कळकळीने लिहिलेली पुस्तके वाचू लागलो.

असे आम्ही रोज वाचू लागलो आणि आम्हाला रोजच एक तास वाचण्याची सवय लागली. हा आमचा गृहपाठ आजही रोज सुरु आहे. सुरुवातीला रोज आम्ही फोनवर संयुक्त जोडणीवर (conference call) एकत्र येऊ लागलो. नंतर आम्ही झूम मीटिंगच्या पटलावर एकत्र येऊन अभ्यास करू लागलो. अगदी अनायासे, सहज सुरु झालेल्या या वाचनाला रोज करण्याच्या गृहपाठाचे रूप आले.

हे वाचत असताना आमच्यापैकी एका स्नेह्याने एक सूचना केली की हे पुस्तक आपल्या संपूर्ण जीवनासाठी उपयोगाचे आहे, म्हणून आपण आपले वाचन रेकॉर्ड करून ठेवूया. आपल्यालाच ते पुढे संदर्भासाठी किंवा पुन्हा आवर्तन करायचे असेल तर खूप उपयोगी होईल. म्हणून आम्ही गृहपाठ रेकॉर्ड करून ठेवायला लागलो.

मार्च २०२० पासून आजपर्यंत म्हणजे मार्च २०२५ पर्यंत

अशा विविध विषयांवरील मूलभूत पुस्तके वाचून झाली.

सध्या आम्ही श्रीमद्भगवद्गीतेवर परम पूजनीय स्वामी वरदानंद भारती यांनी केलेले सविस्तर विवरण वाचत आहोत. त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहोत.

गृहपाठाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या सनातन संस्कृतीचा आग्रह

आपल्या ऋषिमुनींनी - मानवाचे म्हणजे आपले जीवन उन्नत व्हावे, सतत विकसित होत राहावे म्हणून काही मुख्य संकेत दिले आहेत आणि काही गोष्टींचा आग्रह केला आहे.

त्यामध्ये मूलभूत शास्त्रग्रंथांचा - किंवा मूलभूत तत्वज्ञान ग्रंथांचा अभ्यास नित्य करावा असा एक आदेश किंवा आग्रह आहे.

हा गृहपाठ म्हणजे त्याच दृष्टीने मूलभूत ज्ञान व समज वाढवण्याचा एक प्रयत्न आहे.

गृहपाठ करणे - हे आपल्याला खरे म्हणजे नवीन नाही. आपण प्रत्येकाने शाळेत असल्यापासून तो केलेलाच असतो. परंतु शाळेतील शिक्षण संपल्यानंतर गृहपाठ करायची सवय सुटते. कारण आता एखाद्या विषयाचा गृहपाठ करण्याची काय गरज? - असा गोड समज करून आपण गृहपाठ करायचे थांबवलेले असते. परंतु जे काही ना काही कारणाने सतत नवीन शिकत असतात ते वयाने मोठे झाले तरी आपसूकच गृहपाठ करत असतात. काही व्यवसाय असे आहेत की त्यातील नवे नवे विषय किंवा नवे संशोधन त्यांना नेहमी अभ्यासावे लागते. आपले दीर्घदृष्टी असलेले ऋषी म्हणतात की तुम्ही केवळ ज्ञानोपासनेची पण नित्य अभ्यास करत रहा.

शाळेत असताना – गृहपाठ आपण दोन प्रकारांनी करत असू

  1. एकट्याने वाचन करून, विषयाच्या नोट्स काढून अभ्यास करणे.
  2. दोन-तीन मित्रांनी एकत्र येऊन, समजून घेत, चर्चा करत अभ्यास करणे.

आपण आता जो गृहपाठ करत आहोत तो दुसऱ्या प्रकारचा आहे. काही जणांनी एकत्र मिळून केलेला गृहपाठ. या गृहपाठात एक-एक मूलभूत विषयाचे ग्रंथ वाचायला घेतो. वाचताना मध्ये एखाद्या मुद्यावर चर्चाही करतो.

वाचनाचेही दोन प्रकार असतात :

  1. सलग, न थांबता वाचणे – ज्यामुळे एकूण विषय काय आहे हे लक्षात येते. विषयाचा सारांश लक्षात येतो. असे जेव्हा करतो तेव्हा त्याला आपण पारायण म्हणतो.
  2. दुसरा प्रकार म्हणजे सावकाश, समजून घेत वाचणे – यामुळे संकल्पना आणि सिद्धांत समजण्यास मदत होते.

सावकाश, समजून घेत वाचनातून काय साध्य होते?

गृहपाठाचा हेतू आणि प्रक्रिया

म्हणून हा गृहपाठ म्हणजे मनन सुरू करण्याची प्रक्रिया आहे. हे करताना काही शंका किंवा प्रश्नही येतात. मग ते प्रश्न एकमेकांना विचारायचे आणि त्याचे समाधान मिळते का? याचा प्रयत्न करायचा.

असे केल्याने —

  1. वाचन किंवा श्रवण केल्यानंतर मनन
  2. त्यानंतर चिंतन

अशा क्रमाने आपण आपोआप पुढे जाऊ लागतो. यामुळे विषय समजायला खूप मदत होते. एकच विषय वेगवेगळ्या प्रकारांनी समजतो. प्रत्येकाला त्यात सहभागी होता येते.

सर्व प्रश्नांचे समाधान मिळेलच असे नाही. पण चिंतन सुरू झाले की हळूहळू समाधान घडते. कधी तोच ग्रंथ वाचताना आधी आलेल्या प्रश्नाचे समाधान पुढच्या परिच्छेदात किंवा पुढच्या प्रकरणातही होते. यामुळे धीर धरण्याचीही सवय लागते. असे करण्यासाठीचा प्रयत्न म्हणजे हा गृहपाठ आहे

गृहपाठाचे स्वरूप

विचारांची प्रक्रिया

अभ्यासाचे महत्त्व

संत-महापुरुष अभ्यास पद्धतीविषयीचे सांगणे

संत-महापुरुष सांगतात की अभ्यासाची प्रक्रिया अशी असते —

  1. सुरुवात श्रवणाने होते, तसेच ती वाचनानेही होते.
  2. त्यानंतर मनन.
  3. मग चिंतन.
  4. त्यानंतर निदिध्यासन.

गृहपाठ करताना आपण श्रवण/वाचन आणि मनन या दोन गोष्टी मनापासून करण्याचा प्रयत्न करतो. मनन सुरू झाले की चिंतनही आपोआप सुरू होते.

मननाची दिशा कोणती असावी? मननाचे उद्दिष्ट काय असावे?

मननाची उद्दिष्टे विविध असू शकतात —

या पैकी "मला संकल्पना समजावी म्हणून" आणि "मला आचरणात आणण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणून" या दोन उद्दिष्टांना धरून आपण हा गृहपाठ करतो.

गृहपाठाचे उद्दिष्ट

या गृहपाठाच्या माध्यमातून, याच हेतूने ज्यांना काही ग्रंथ अभ्यास करायचा आहे, विषय जाणून घ्यायचा आहे, त्यांना हे रेकॉर्डिंग उपलब्ध करून देत आहोत.

जिज्ञासूने त्यातील एखादा ग्रंथ स्वतः ठरवून रोज हा गृहपाठ ऐकला, तर त्याचा निश्चितच खूप छान अभ्यास होऊ शकतो, असा आम्हाला विश्वास आहे.

गृहपाठाचा सारांश

  • रोज एक तास मूलभूत ग्रंथ वाचन.
  • जिज्ञासू व्यक्तींनी एकत्र येऊन श्रवण / वाचन आणि मनन.
  • स्वतःच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न.
  • गंभीर आणि सखोल विचार करण्याची सवय.
  • सनातन संस्कृतीच्या अभ्यासातून ज्ञान आणि जीवनदृष्टी विकसित करणे.

"वाचन + मनन = आत्मसात"

हा गृहपाठ फक्त अभ्यास नाही, तर आयुष्याला दिशा देणारी एक संस्कार प्रक्रिया आहे.

या प्रकारे आमचा गृहपाठ गेली पाच वर्षे सुरू आहे आणि पुढेही चालू राहील !

श्रवण, मनन, चिंतन करीत,
सवय अभ्यासाची सत्य शोधीत

शिदोरी ही संस्कारांची,
खरी संपत्ती आयुष्यभराची

ज्ञानाचा दीप उजळत राहो,
विवेकाची वाट प्रकाशित होवो

प्रामाणिक प्रयत्नांची साथ मिळो,
सद्गुणांनी जीवन समृद्ध होवो

गट चालू करण्यासाठी आपली नोंद करण्यासाठी येथे क्लिक करा नोंद